ताण

मला आजही तो दिवस चांगला आठवतो . पेपरमध्ये बातमी आली होती की वय वर्ष १३ / १४ वयाच्या मुलाचा मृतदेह एका खाणीमध्ये सापडला .बहुदा तीन दिवसांपूर्वी मुलाचा ह्या खाणीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा पोलीसांचा अंदाज होता . याच बरोबर मुलगा घर सोडून गेल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी केली होती . त्यामुळे ही आत्महत्या देखील असू शकते असेही वर्तवले जात होते .

पण काहीही म्हणा ह्या बातमीमुळे मी देखील खूप अस्वस्थ होते . मनात विचार येत होता की, एव्हढया लहान वयात ह्या मुलाच्या मनात घर सोडून जाणे किंवा आत्महत्या करण्याचे धाडसच कसे काय झाले असावे ?

मग मी त्याच्या घरच्यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर १० व्या दिवशी मी त्याच्या घरी पोहचले . खोलीत १० / १२ माणसे दाटीवाटीने बसली होती व एका छोटया स्टूलवर मुलाचा हार घातलेला फोटो होता .मी फोटो निरखून पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर केव्हढी ती निरागसता होती .

 मग मी त्या सर्व माणसांमध्ये त्याचे आई – वडिल शोधू लागले . एक पुरुष नशा केल्याप्रमाणे मुला बाबत असंबद्ध बोलत होता तर एक स्त्री मोजकेच बोलत होती. तीचे डोळे व चेहरा सुजला होता. कदाचित हे दोघे मुलाचे आई – वडिल असावेत असे मला वाटले . मग त्या स्त्रिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकल्यावर माझा अंदाज खरा ठरला . तीच्या सांगण्यावरुन तिचा मुलगा इयत्ता ९वी मध्ये इंग्रजी माध्यमात खाजगी शाळेत शिकत होता . शाळेची फी बऱ्याच महिन्यांपासून थकली होती . फी करिता शाळेने चांगलाच तकादा लावला होता . ( घरची गरिब परिस्थिती , मुलांच्या वडिलांना दारुचे प्रचंड व्यसन . चार महिन्यापूर्वीच ह्या छोट्या खोलीत हे कुटुंब भाडयाने रहायला आले होते . याआधीच्या घरमालकाने यांचे वर्षभराचे घरभाडे थकल्यामुळे अंगावरच्या कपडयांनिशी सर्वांना घराबाहेर काढले होते . अशी माहिती मला बाहेरून समजली )

तर शाळेच्या फी साठी शिक्षकांकडुन  इतर मुलांसमोर मुलाच्या आईला अपमानकारक शब्द बोलले गेले . त्यामुळे मुलगा शाळेत जायच्या मन : स्थितीत नव्हता . परंतु आपल्याला एकुलता एक मुलगा. त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे हा एकच ध्यास त्याच्या आईच्या मनात असल्यामुळे  झालेला अपमान जास्त जिव्हारी न लावता ; दुसऱ्या दिवशी त्याला मात्र शाळेत जाण्यासाठी तिने जबरदस्ती केली . तो  जायला तयार नसल्याने तिची बरीच चिडचिड झाली . अखेर वैतागुन मुलाने शाळेत जाण्याची तयारी केली आणि जाताना तिला आतमध्ये कोंडून त्याने  दाराला बाहेरुन कडी लावली . त्याच्या आईला वाटले की त्याने रागाने असे कृत्य केले असेल ; त्यामुळे काही वेळात तो स्वतःच शांत होईल.

 संध्याकाळ झाली तरी आपला मुलगा घरी आला नाही म्हणून मग बरीच वाट पाहून इतरांकडे त्याच्या बद्दल चौकशी केली तर तो शाळेत गेलाच नसल्याचे तिला समजले . मग जराही वेळ न दवडता तीने व तिच्या नवऱ्याने मुलाबाबत पोलीसांकडे रितसर तक्रार नोंदवली .

आता …… तीन दिवसांनंतरची वस्तुस्थिती पाहाता ; तीचे सर्वस्वच हरवले होते . मनात प्रचंड अपराधीपणाची  भावना तिच्या बोलण्यातून जाणवत होती . “मी त्याला शाळेत जायची जबरदस्ती केली नसती तर  बरं झालं असतं “. हे तिचं वाक्य कितीतरी वेळा बोलून झालं होतं .

चूक कोणाची होती ? मुलाची ? त्याच्या वडिलांची ? त्याच्या आईची ? की शाळेची ? माझ्या डोक्यात विचारचक्र सुरु होते .

राहून -राहून एकच वाटत होते की अशावेळी ह्या मुलाला व्यक्त होण्याची जागा मिळाली असती तर ….तर आज तो आपल्या सर्वांमध्ये असता .

त्याच्या एका कृती मागे कितीतरी भयंकर ताण असावा . खरंच ह्या मुलाने व्यक्त व्हायला हवे होते .

पुढे काही माहिने मुलाचे पालक त्यांच्या गावी गेल्याचे त्यांच्या नातेवाईकाकडून समजले.

मी काही वर्षांनंतर पून्हा त्याच नातेवाईकाकडे मुलाच्या आई – वडिलांची चौकशी केली तेव्हा समजले. त्याचे वडिल कुठे निघून गेले माहित नाही  आणि त्याची आई बरेच महिने मुलाच्या आठवणीने खचून गेली होती. तिला आम्ही काही विचारले की म्हणते , ” मरण येत नाही म्हणून जगते ” आणि आताच काही माहिन्यांपूर्वी ती एका अनाथ मुलांच्या आश्रमातच रहाते अशी माहिती नातेवाईकाने दिली . तेव्हा माझ्या मनात आले कि अखेर तिने तिचा मार्ग शोधला .

कदाचित ती अनेक मुलांची आई होऊन आपले आईपण अनुभवत असेल .

सजगता मनाची

मनं   वढायं वढायं
उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकलं हाकलं
फिरी येतं पिकावर

बहिणाबाई चौधरी यांनी मनाच्या अवस्थेबद्द्ल , मनाबाबत खुप छान प्रकारे कथन केले आहे .
आपलं मन थाऱ्यावर नाही , मन दुःखी झाले , मनाची बेचैनी वाढली , मन विचलीत झाले असे एक ना अनेक मनाचे कंगोरे आपण सर्वच जण अनुभवत असतो ; ह्या अनुभवातून जाताना मन स्थिर असणे , मनःशांतीची गरज वाटणे हे ही सहजपणे बोलले जाते आणि याकरिता प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करताच असतो .
त्यापैकीच काही महत्वाचे वाटलेले मुद्दे 
खालील प्रमाणे : –

१ ) – कोणत्याही परिस्थितीत विचारांची घाई करू नये .
2 ) -आपल्यातील अशांतीचे कारण आपणच असतो त्यामुळे इतरांना कधीच दोष देऊ नये .
३ ) – आजपर्यंतच्या तयार झालेल्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करणे .
४ ) तक्रारी ऐवजी कृतज्ञ भाव जोपासणे .
५ ) – प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे , नकारात्मक दृष्टीकोन बदलणे .
६ ) – मनात आलेला विचार कोणतीही प्रतिक्रिया लगेच न देता प्रथम शांतपणे जाणून घेणे .

थोडक्यात सांगायचे तर मनाच्या सजगतेचे व्यायाम आपण करू शकतो ; उदा . राग आल्यास काहीही प्रतिक्रिया न देता त्या भावनेला , विचारांना न नाकारता शांत बसून जाणून घेणे . अधुनिक मानसशास्त्रात सांगतात की “All Emotions are ok , all behaviour is not OK

म्हणजेच मनात आलेली प्रत्येक भावना कृतीत आणलीच पाहिजे हा अट्टाहास आपण सर्वप्रथम सोडला पाहिजे .
अधुनिक मानसशास्त्रात आणि मेंदू विज्ञान संशोधनात असे आढळले की मनाच्या सजगतेचे व्यायाम रोज २० मि . असे सलगपणे दोन महिने केल्यास आपल्या भावनिक मेंदूची तिव्रता , त्याची activity कमी करून pre – frontaI cortex ची activity कमी करून Pre-FrontaI Cortex ची activity वाढवली जाते व त्याचे रचनात्मक बदल आपल्या मेंदूत दिसतात ; जसे की Pre – FrontaI Cortex मध्ये Memory Learning च्या cortex मध्ये नविन पेशी विकसित होताना दिसतात .

तेव्हा आपण आपल्या मनाची शक्ती वाढवणे हि सर्वस्वी स्वतःचीच जबाबदारी आहे .

धडा

मी कॉलेजच्या सुरुवातीला म्हणजे ११ वी ,१२ वीमध्ये असताना बऱ्याचदा दृष्टीहिन बांधवांच्या परिक्षेसाठी “Writer” चे काम केलेले होते . मी व माझे काही वर्गमित्र / मैत्रिणी सतत ह्या बांधवांच्या संपर्कात होतो  .
त्यानंतर पुढील ५ / ६ वर्ष . माझा ह्या बांधवांशी संपर्क झाला नाही . प्रत्येक जण आपल्या अभ्यास व करियरच्या मागे लागलेला . 
कालांतराने मला नौकरी 
लागली . वेळे अभावी  कोणाची भेट घेणेही शक्य नव्हते . 
असेच एकदा पुणे स्टेशन च्या कर्वे नगर बसस्टॉप वर बसची वाट पहात असलेला कॉलेजमधील आमचा एक दृष्टीहिन बंधू मला दिसला . त्याला पहाताच मी तो उभे असलेल्या ठिकाणी झप-झप पाऊले उचलत त्याला गाठण्याचा प्रयत्न केला . बसमुळे आमची चूकामूक होऊ नये ही मनात भीती  होतीच .
अखेर मी त्याला वेळत गाठलेच . त्याच्या जवळ जाताच मी त्याच्या हातात हात देऊन त्याची चौकशी केली . तसेच एव्हढया वर्षांनी भेटल्यामुळे आति उत्साहाने त्याला म्हणाले, “ओळखलंस का ?” तर त्याने सहजच हो म्हणून सांगितले . मग मी जणू काही त्याची परिक्षा घेण्याच्या आविर्भावात  त्याला विचारले की “माझे नाव सांग” . त्यानेही मिष्कीलपणे हसत उत्तर दिले .  “सांगतो पण एका अटीवर ” . ” अट ? कोणती अट ? “ मी सहजपणाने विचारले . तर तो म्हणाला ” तुला देखील माझे नाव सांगावे लागेल “ केव्हढा आत्मविश्वास होता त्याच्या बोलण्यात आणि मी मात्र बघु तरी … त्याला माझे नाव सांगता येते का नाही या तोऱ्यात .
क्षणाचाही विलंब न लावता त्याने माझे नाव उच्चारले ” अंजली “  मी आवक् होऊन त्याच्याकडे पाहातच राहिले आणि आता मात्र माझ्यावर वेळ होती . तो मला म्हणाला “अंजली आता माझे नाव काय ? सांग ना ? “ मला काही केल्या त्याचे नाव आठवेचना , खुप खजील झाल्यासारखे वाटले , डोकं कामच करेना . असं वाटू लागलं की पटकण् त्याची बस यावी . अन् त्याच क्षणी जणू काही त्याला माझ्या मनात चाललेला गोंधळ समजला असावा . तो म्हणाला “काळजी करू नकोस ; तु जोपर्यंत माझे नाव सांगणार तोपर्यंत मी काही जाणार नाही “. आता घ्या .. आली का माझी पंचाईत  . डोकं खाजवून वेड लागायची वेळ आली होती .
शेवटी हतबल होऊन खाली मान घालून खोल आवाजात मी त्याला म्हणाले “नाही रे ! खरंच  मला नाव आठवत नाही , प्लीज नाव सांग ना तुझे ; यापुढे मी नाही विसरणार  “ .
माझी हतबलता पाहून शेवटी मोठया मनाने त्याने सांगितले ” भ ग त “ 
आज मला माझ्या मर्यादा जाणवल्या . खरंच मला चांगलाच धडा शिकवला माझ्या ह्या दृष्टीहिन, पण मनाने डोळस असलेल्या बांधवाने .

शोध माणसांचा

१९९३  साली महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी  पाहाटेच्या सुमारास भूकंप झाला  आणि सगळीकडे एकच हाहाकार , चिंतेचे आणि भितीचे वातावरण तयार झालेले.

माझे तेव्हा कॉलेजचे म्हणजेच MSW चे दूसरे वर्ष होते . मला आजही ठळकपणे आठवते ती म्हणजे आमच्या बरोबर शिकणाऱ्या लातूर येथील विद्यार्थांची अवस्था . बातमी समजताच त्यांनी त्यांच्या गावी धाव घेतली . तेथील विदारकतेची आम्ही केवळ जाणीवच करू शकत होतो. मात्र दुःखाची तिव्रता काय असते  ,भयावह अनुभव कसे असतात हे आम्ही आमच्या त्याच वर्गमित्रांकडुन ऐकले आणि अंगावर अक्षरशः शहारे आले .

मी तेव्हाच ठरवले होते की भूकंपग्रस्त भागातच ( लातूर येथे ) पहिली नौकरी करायची . त्यामुळे दुसऱ्या वर्षीच म्हणजे १९९४ साली कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये माझी निवड झाली व महिनाभरात लगेच मी माझ्या कामाच्या ठिकाणी रुजू झाले .

असेच एकदा मी कामानिमित्त भूकंपग्रस्त भागांपैकीच  असलेल्या एका छोट्याशा गावात गेले होते व बराच उशीर झाल्यामुळे रहात्या ठिकाणी माघारी येणे जमणार नव्हते . म्हणून ती रात्र गावातील एका माहिले बरोबर काढायची ठरवले. ती एकटीच रहाते एव्हढेच समजले होते . तिची तशी ओळख नव्हतीच परंतू आपत्ती काळात गावकरी व संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तीं बरोबर माणुसकीचे नाते तयार झालेले असते . त्यामुळे मी त्या मावशींच्या घरीच रात्रीचे जेवण केले . बोलताना समजले की भुकंप होण्याच्या एक दिवस आधी त्या त्यांच्या बहिणीकडे काही कामानिमित्त त्यांच्या धाकटया मुलीला बरोबर घेवून गेल्या  होत्या . घरी मात्र थोरली मुलगी थांबली होती.  तेव्हाच काळाने घात केला अन् भूकंपात मातीच्या ढिगाऱ्याखाली थोरली मुलगी अडकली . तीला पहाताही आले नाही . धाकटी मुलगी मानसिक धक्क्यातून सावरली नाही तिला आजीकडे ठेवले , नव-याचे तर दोन वर्षांपूर्वीच आजारपणात निधन झालेले . कोरडया डोळ्यांनीच संवाद सुरु होता . काय करणार ? दुःखाचा डोंगरच एव्हढा होता की कित्येकांच्या डोळयातले पाणीच अटलेले . मला काय बोलावे सुचेचना . त्यांची नजर मात्र सतत काहीतरी शोधत असल्याचे जाणवत होते .                             
थोड्या वेळाने ती माऊली म्हणाली . माझी थोरली मुलगी तुमच्या ए्व्हढीच होती तीचे केसही असेच लांबसडक होते . मी  तुमच्या डोक्याला तेल लावून देऊ का ? तर मी सहजपणे होकार दिला . मग  त्यांनी लगेच एका वाटीत खोबरेल तेल घेतले व त्यांची हाताची बोटे हळुवार पणे माझ्या केसांमधून फिरू लागली किती तरी वेळ …  त्यांच्या स्पर्शातून त्या त्यांच्या मुलीला शोधण्याचा प्रयात्न करत असल्याचे मला उगाचच वाटले ; म्हणून मी डोळयाच्या कोपऱ्यातून हळूच त्या माऊलीकडे पाहिले तर … अश्रूंच्या धारा त्यांच्या गालावरून ओघळत होत्या .मी काहीच बोलले नाही . सकाळी उठल्यावर माझ्या अंघोळीसाठी चुलीवर गरम पाणी माझ्या माऊलीने ठेवले होते . तसेच गरम – गरम चहाचा कपही माझ्या पुढयात ठेऊन ; अजुन एक नविन फर्र्माईश केली की आज मी तुम्हाला न्हऊ-माखू घालणार आहे . मी देखील खुशीने मान्य केले .मग नव्य उत्साहाने ह्या माऊलीने स्वतःच्या मुलीला शोधत ,अनुभवत माझे केस शिकाकाईने स्वच्छ करण्यास सुरुवात केली . दोघीही शांतच होतो .

माझ्या साठी हे सारं काही शब्दांचाही पलीकडचे होते .कितीतरी जण कितीतरी जणांना शोधत असावीत असे वाटून गेले . खरंच मनाला चटका लावणारा हा अनुभव .

देव देव्हाऱ्यात नाही

अधुनिक काळातही कधी – कधी असे काही माणुसकीचे दर्शन होते की खरंच नतमस्तक व्हायला होतं .
असाच मला एक अनुभव आलेला . पुणे शहर म्हणले की वाडा संस्कृती ते आता पर्यंतच्या इमारती व हॉटेल्स . तर अनुभव असा-  वय वर्ष साधारण ६५ असलेली साध्या वेषातील स्थूल माहिला मला भेटायला आली . चेहऱ्यावरून ती बऱ्याच चिंतेत असल्याचे जाणवले तिने बोलायला सुरुवात केली ” मॅडम पुना में हमारा बडा होटल है I अब होटल तो मेरे बेटे संभालते है | ”  मी त्यांना विचारले  “समस्या क्या है ? “

प्रश्न ऐकताच त्यांच्या डोळ्यात अश्रु आले आणि त्यांनी थोडक्यात सांगायला सुरुवात केली की ” मै शादी के बाद पती के साथ पूना मे आयी I मेरे पतीने छोटेसे होटल से अपना कारोबार शुरु किया I परिस्थिती इतनी अच्छी नाही थी । गांव से ही भोला नाम के अनाथ लडके को काम के लिए पुना लेके आये | भोला स्वभाव से भी भोला था | वह रसोई अच्छेसे संभालता था | मुश्कील हालात में उसने अपने मालिका का हमेशा साथ दिया I वह हमारे परिवार का हिस्सा बन गया था | सब कुछ अच्छा चल रहा था I धीरे -धीरे करोबार बढ़ने लगा । हमारे बच्चे भी अच्छी स्कूलों में जाने लगे I भोला के सामने हम दोनोंने शादी का प्रस्ताव कई बार रखा परंतु उसने मना कर दिया | अगर वो शादी करता तो आज यह दिन उसे देखना न पडता I अब आज के हालात ऐसे है की मेरे पती को गुजर के ७ साल हुए मै खुदको बेसहारा मेहसूस करती हूँ I अब बच्चों का राज है I होटल का कारोबार मेरे बच्चे संभालते है | बँक का कर्जा , बच्चों की जिम्मेदारी इस कें साथ मेरी और भोला की भी जिम्मेदारी उनके उपर है I भोला के  पैर मे जख़म है I उमर के कारण वह भी बार- बार बिमार रहता है I चाहते हुए भी मै भोला को सहारा नहीं दे सकती I बच्चे उसे वापस गाँव छोड आने की बाते करते है I लेकीन मेरा मन इस बात के लिए तय्यार नही I ” सर्व ऐकल्यावर भोलाच्या उपचारांसाठी त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याबाबत सांगितले तेव्हा पटकण् त्यांनी प्रतिउत्तर दिले की त्यांच्याच  family doctor ने भोलाला सरकारी हॉस्पीटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले . आतापर्यंत मला चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले होते जसे की भोलाच्या मालकीणीची हतबलता, कुटुंबातील असलेले त्यांचे न्यून स्थान .

त्यामुळे मग आम्ही हॉस्पीटल मध्ये जाण्याचा दिवस ठरवला . ठरल्याप्रमाणे आम्ही ससून हॉस्पीटल मध्ये भेटलो . भोला त्याच्या मालकीनी बरोबर रिक्षाने आला होता . तो लंगडतच चालत होता . त्याच्या पायाची जखम बरिच चिघळली होती . “जखम में maggetts भी है ” असे O P D तील डॉक्टरांनी सांगितले . तसेच नर्स जखम साफ करुन ड्रेसिंग करेन असे म्हणाले . मग आम्ही नर्स येण्याची वाट पाहू लागलो . एक तास झाला कुणीच आले नाही ; त्यामुळे कंटाळून एका स्टाफला विचारले तर त्याने सांगितले की काही मेडिकल  स्टाफ strike वर  गेला आहे ; परंतु आमची emergency आहे असे सांगितल्यावर ” थांबा काही वेळ  ” एव्हढेच उत्तर मिळाले . खूप वाईट वाटले . भोला तर काहीच बोलत नव्हता . शांतपणे पुढच्या निर्णयाची वाट पहात होता . त्यातच त्याच्या मालिकाणीच्या संयमाचा बांध फुटला . ती हतबल होऊन गयावया करू लागली ” कुछ भी किजिए मॅडम ; पर आजही भोला के ईलाज और रहने का बंदोबस्त . करना है I मै उसे वापस घर लेकर नही जा सकती हू I घर में बहोत अशांती का माहोल है I ” एकदा भोला कडे पाहिले तो मात्र शून्यातच . माणुस किती हतबल होऊ शकतो ; ते ही ह्या उतार वयात ? विचार करून डोकं सुन्न व्हायची वेळ आली . त्यातच नर्स आणि डॉक्टरांची किती वेळ वाट पहायची . भोलाकडे तर पहावत नाव्हते. काय करावे सुचेना .

अचानक अंधारात वाट दिसावी असे लख्कन आठवले ते ताडीवाला रोड येथील मदर तेरेसा आश्रम . पण भोलाला आश्रमवाले का म्हणून ठेऊन घेतील ? असा प्रश्न पडला .

परंतु मनाची तयारी केली आणि तिघेही रिक्षाने आश्रमाकडे निघालो . प्रवासभर वाटत होते की भोलाला त्यांनी ठेवुन घेतले नाही तर ? का भोलाला आम्ही ओळखतच नाही . असे सांगावे . एक ना अनेक असे विचार डोक्यात घोळत होते. त्यातच आश्रमा जवळ कधी पोहोचलो समजलेच नाही . तिथे सिस्टरची भेट घेतली आणि जी सत्य परिस्थिती होती  ती कधी भड़ाभड़ा बोलले ते मला कळलेच नाही .

सर्व ऐकल्यावर सिस्टरने कोणतेही आढेवेढे न घेता भोलाला तिथल्याच काही स्वयंसेकाला आतमध्ये घेऊन जाण्यास सांगितले .आम्ही त्यांना पुढील Procedure विचारली . त्यांनी  स्मितहास्य करत सांगितले की ; सर्वप्रथम भोलाला गरम पाण्याने आंघोळ घालून मग गरम  दूध प्यायला दिले जाईल  ; तो पर्यंत डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले जातील . पुरुषांचे unit पिंपरी येथे हलवले आहे त्यामुळे तो तिथे आरामात राहिल . तुम्ही आता काळजी करू नका. हे सर्व ऐकताच भोलाच्या मालकीणीने अक्षरशः तिथेच सिस्टरच्या पायावर लोटांगण घातले व समाधानाने म्हणाली ” भगवान तो यहा है I “
 खरंच मी देखील आज माणसातील देव पाहिला .

दिवसभारात मलाही वाटत होते की , का म्हणुन हे हॉटेलवाले जबाबदारी टाळत आहेत ? यांच्या जाणिवा बोथट झाल्यात का ?
परंतु काही प्रश्न जबरदस्तीने सोडवायचे नसतातच मुळी .आपण आपल्यातील माणुसकी जपत फक्त काम करायचे मार्ग मिळत जातात . वाटेवर असे मणुष्यरुपी संत भेटत जातात . खरंच अशा माणसांना मनापासून साष्टांग दंडवत .

सामांन्यातील असामान्यत्व

काही प्रसंग , व्यक्ती आपल्या मनात कायमचं स्थान निर्माण करतात ते त्यांच्या काही विशिष्ट गुणांमुळे. त्यांच्याकडुन सकारात्मक उर्जा मिळते , प्रेरणा मिळते मग भले त्या व्यक्ती प्रसिद्ध नसोतही.
तर माझ्याही आयुष्यात आलेल्या व्यवतींपैकीच एक व्यक्ती म्हणजे  कुणी महान किंवा अती प्रसिद्ध नसून शारीरिकदृष्टया हाताने अपंग ,  एकटीच रहाणारी, बेरोजगार, परिस्थिती पुढे हतबल परंतु प्रयत्नवादी व सदैव हसतमुख.

चला तर मग जाणुन घेऊ या ; गोष्ट साधारण १५ वर्षांपूर्वीची मी पुणे अंध जण मंडळ येथे नौकरी करत असताना अचानक दोन आठवड्यांपासून आमच्या ऑफीसमध्ये किरकोळ मदतीकरिता येणाऱ्या आमच्या काही अंध बांधवांबरोबर एक नवीन इसम ( डोळ्स ) येऊ लागला. शरिरयष्टी किरकोळ व दोन्ही हात कोपरापासून नसलेला . मग वाटले त्याला विचारावे त्याच्या दोन्ही हातांच्या व्यंगाबाबत. परंतु दोनदा प्रयत्न केले धाडस झाले नाही . मग एकदा मनाचा हिय्या करून विचारलेच ; तर त्याने अगदी सहजपणे उत्तर दिले कि ४ वर्षांपूर्वी त्याचा अपघात झाला . तो सांगू लागला की लातूर येथील छोट्याशा खेड्यात तो रहात होता. त्याचे शिक्षण केवळ लिहीता वाचता येण्यापुरतेच झालेले. घरची बरीच गरिबी त्यात पत्नी व दोन मुले असा परिवार. तो मिळेल ते (मोल मजुरीचे ) काम करत व बऱ्याचदा  ट्रकचालकाबरोबरही क्लिन्नर म्हणून बाहेरगावीही जात असे . असेच एकदा जात असताना रस्त्याच्या मधोमध काही इलेक्ट्रीक वायर लोंबताना ड्रायव्हरने पाहिले व त्याने ह्याला लाकडाच्या सहाय्याने वायर बाजूला करण्यास सांगितले.” इथपर्यंतच मला आठवते” म्हणाला .” त्यानंतर शुध्द आली ती थेट दवाखान्यातच आणि पहातो तर काय दोन्ही हात कोपरापासून गेलेले. खुप धक्का बसला ,खुप रडलो ,डोळ्यापुढं अंधारच होता. त्यात अजून भर पडली ती म्हणजे वर्षभरात बायको दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली. तीला तरी काय दोष द्यावा कारण ती आता माझं करंल का पोरांचं . मग मीच विचार केला आता एकटयानेच जगायंच . आई वडिल तर आधीच वारले आता जवळच असं कुणीच नव्हतं .पोटात भुकेचा आगडोंब उठायचा ; हळु – हळु बाहेर पडलो. भीक मागून पोट भरू लागलो . तिथच माझी एका अंधामित्राबरोबर ओळख झाली. त्यांच्या बरोबर आलो पुण्यात . आता त्यांच्याच बरोबर रूपी नगर मध्ये रहातो . घराची सोय झाली . दिवसभर ह्या मित्रांना मदत करतो ; आणि संध्याकाळी सगळे सोबतच रुपी नगरला जातो . रात्रीचा स्वयंपाक करून मस्त पोटभर जेवतो आणि झोपतो . कसलं पण टेन्शन नाही ” तो बोलतच होता मी मात्र मंत्रमुग्ध झाल्यासारखे ऐकत होते . बाकीचे कर्मचारी देखील स्तब्धपणे ऐकत होते. भानावर येताच मी माझा पहिला प्रश्न विचारला की ” स्वयंपाक कसा काय बनवता ? ” तर तो म्हणाला ” “सोप्प आहे . पायाच्या मदतीने स्टोव्ह भिंतीला टेकवतो ; मग पायाच्या बोटांच्या सहाय्याने पंप मारतो आणि मग मस्तपैकी खिचडी भात बनवतो . मदतीला वाटलंच तर अजुबाजुला माझे मित्र आहेतच . “
यानंतर लगेच मी दुसरा प्रश्न विचारला ” बनवलेली खिचडी कशी खाता? ” त्यावरही तो खुद्कन हसला व कमरेतून खाली वाकला. दंडापासून असलेल्या अर्ध्या हातामध्ये काही तरी पॅण्टच्या खिशातून काढले व तोंडाच्या सहाय्याने दुसऱ्या अर्ध्या हातामध्ये काहीतरी कडे अडकवल्यासारखे अडकवले तसेच पुन्हा दुसऱ्या हातानेही अडकवले बहुतेक ते इलॅस्टीक बॅण्ड असावे . मग पुन्हा तशीच कृती करून चमचे दोन्ही हातात असलेल्या कडयारूपी इलॅस्टीक बॅण्ड मध्ये तोंडातील दातांच्या सहाय्याने अडकवले आणि चमच्याने खाण्याची कृती करून दाखवली व म्हणाला असे पोटभर खातो ” क्षणभर काहीच बोलता आले नाही . मग अचानक तोंडातून आपोआपच शब्द निघाले ” “GREAT ! “

जेव्हा केव्हा परिस्थिती पुढे हतबल झाल्याचे जाणवते तेव्हा मला ही GREAT व्यक्ती आठवते . शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय ? हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले . माझे भाग्यच म्हणायला पाहिजे .

सजगता मनाची

मनं   वढायं वढायं
उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकलं हाकलं
फिरी येतं पिकावर


बहिणाबाई चौधरी यांनी मनाच्या अवस्थेबद्द्ल , मनाबाबत खुप छान प्रकारे कथन केले आहे .
आपलं मन थाऱ्यावर नाही , मन दुःखी झाले , मनाची बेचैनी वाढली , मन विचलीत झाले असे एक ना अनेक मनाचे कंगोरे आपण सर्वच जण अनुभवत असतो ; ह्या अनुभवातून जाताना मन स्थिर असणे , मनःशांतीची गरज वाटणे हे ही सहजपणे बोलले जाते आणि याकरिता प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करताच असतो .
त्यापैकीच काही महत्वाचे वाटलेले मुद्दे 
खालील प्रमाणे : –

१ ) – कोणत्याही परिस्थितीत विचारांची घाई करू नये .
2 ) -आपल्यातील अशांतीचे कारण आपणच असतो त्यामुळे इतरांना कधीच दोष देऊ नये .
३ ) – आजपर्यंतच्या तयार झालेल्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करणे .
४ ) तक्रारी ऐवजी कृतज्ञ भाव जोपासणे .
५ ) – प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे , नकारात्मक दृष्टीकोन बदलणे .
६ ) – मनात आलेला विचार कोणतीही प्रतिक्रिया लगेच न देता प्रथम शांतपणे जाणून घेणे .

थोडक्यात सांगायचे तर मनाच्या सजगतेचे व्यायाम आपण करू शकतो ; उदा . राग आल्यास काहीही प्रतिक्रिया न देता त्या भावनेला , विचारांना न नाकारता शांत बसून जाणून घेणे . अधुनिक मानसशास्त्रात सांगतात की “All Emotions are ok , all behaviour is not OK

म्हणजेच मनात आलेली प्रत्येक भावना कृतीत आणलीच पाहिजे हा अट्टाहास आपण सर्वप्रथम सोडला पाहिजे .
अधुनिक मानसशास्त्रात आणि मेंदू विज्ञान संशोधनात असे आढळले की मनाच्या सजगतेचे व्यायाम रोज २० मि . असे सलगपणे दोन महिने केल्यास आपल्या भावनिक मेंदूची तिव्रता , त्याची activity कमी करून pre – frontaI cortex ची activity कमी करून Pre-FrontaI Cortex ची activity वाढवली जाते व त्याचे रचनात्मक बदल आपल्या मेंदूत दिसतात ; जसे की Pre – FrontaI Cortex मध्ये Memory Learning च्या cortex मध्ये नविन पेशी विकसित होताना दिसतात .

तेव्हा आपण आपल्या मनाची शक्ती वाढवणे हि सर्वस्वी स्वतःचीच जबाबदारी आहे .

Create your website at WordPress.com
Get started